भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास भारत त्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. भारताने औदार्याची भूमिका घेऊन पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचा अर्थ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.
त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मागील सहा महिन्यांत सीमा सुरक्षा दल पाकिस्तानने आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देत असल्याचे नमूद केले. त्याआधी असे उत्तर दिले जात नव्हते, अशी पुष्टी जोडत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याच्या प्रश्नावर त्यांनी मध्य प्रदेश सरकारने तसा प्रस्ताव मांडून पारदर्शकतेचे दर्शन घडविल्याचे नमूद केले. या मुद्दय़ावरून विरोधकांनी मध्य प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आधी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरू होती. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. भारतीय संस्कृती जगातील श्रेष्ठतम संस्कृती आहे. या संस्कृतीने मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, इसाई, यहुदी आदी सर्वधर्मीयांचा सन्मान केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर पाकला सडेतोड उत्तर -राजनाथ सिंग
भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास भारत त्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
First published on: 15-07-2015 at 02:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will give befitting reply if pakistan violates ceasefire says rajnath singh