ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. मनिषा कायंदे या विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार आहेत, असं असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना आता मनिषा कायंदे यांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिंदे गट हा शिवसेनेचा अधिकृत पक्ष आहे. शिंदे गटालाच अधिकृत पक्षाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांची अपात्रता मानली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मोठा निर्णय

मनिषा कायंदेंच्या अपात्रतेच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिवसेनेचा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार मनिषा कायंदे यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करत आहोत, असं जरी जाहीर केलं तरी त्यांची अपात्रता मानली जात नाही.”

हेही वाचा- “४० कोटींच्या फाईलमुळे मनिषा कायंदे शिंदे गटात”; राऊतांच्या आरोपावर कायंदेंचं उत्तर

“याचं कारण म्हणजे, मनिषा कायंदेंचा युक्तिवाद असा असू शकतो की, मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडली नाही. पण हा निर्णय अर्थात विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचा आहे. १० व्या परिशिष्टानुसार मनिषा कायंदे अपात्र ठरतात की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय विधान परिषदेचे सभापतीच घेऊ शकतात,” असंही उज्ज्वल निकम म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will manisha kayande disqualified ujjwal nikam reaction rmm