मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केले जाऊ शकते, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया माध्यमांनी विचारली असता गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात. त्यावर जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केले जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसे अजिबात नाही.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात. जरांगे पाटील आणि आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत, त्या मागे घेतल्या जाणार आहेत. ज्याठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे, अशा केसेस परत घेणे शक्य होणार नाही. मात्र इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू केले आहे. सध्या २४ जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेल्या एकूण ४९२ केसेस आहेत. त्याची छाननी सुरू झाली आहे. १७२ केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे. सहा केसेस मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे.
“माझ्या क्लिप व्हायरल करून मला तडीपार…”, मनोज जरांगेंचा फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप
सध्या आचारसंहिता लागली आहे. या काळात छाननी पूर्ण करून आचारसंहिता संपताच त्या केसेस मागे घेतल्या जातील. केसेस मागे घेण्यासाठी संबंधित लोकांना जबाबासाठी पुन्हा बोलवावे लागते. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण करावीच लागते. पण जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले तरी नवीन केस दाखल झाली, असे सांगितले जाते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. सगेसोयरे शब्द असेल किंवा केसेस मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा असेल, ती अंतिम आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर कुणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असून त्यांच्या निर्देशावर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंचा पक्ष शिवसेनेत जाणार?
राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात जाणार असले बोलले जात आहे. यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असा कुणाचा प्रश्न कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जात नसतो. मी शिवसेना किंवा राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही. राज ठाकरे महायुतीत सामील होण्याबाबतची चर्चा सुरू आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माझी उपमा सार्थ ठरविण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न
उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे. माझी उपमा कशी सार्थ ठरेल, याचा आटोकाट प्रयत्न ते करत असतात. फडणवीसांनी उपमा दिली आहे तर ती सार्थच ठरविली पाहीजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते टोमणे मारत असतात. काहीतरी बोलत असतात. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावे. सामान्य माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय बदल करणार आहात किंवा केला आहे? याबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.