मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे, याबाबतचं सूचक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.
सरकारवरील विविध आरोपांमुळे उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरेल, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी गाजणारं अधिवेशन असणार आहे. उबाठा गटाने काय आरोप केले? काय प्रत्यारोप केले? यावर हे अधिवेशन चालणार नाही. या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळू शकतो.”
हेही वाचा- महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट, महाराष्ट्राच्या राजकारणाचा उल्लेख करत म्हणाले…
“सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे, त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे. तो निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी मंत्रिमंडळाची आणि सहकाऱ्यांची बैठकही बोलवली आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देणारं महत्त्वाचं काम होणार आहे,” असंही शिरसाट यांनी नमूद केलं.
शिरसाट पुढे म्हणाले, “दुसरा प्रश्न असा आहे की, सध्या महाराष्ट्रात मराठा समाज, धनगर समाज आणि ओबीसी समाजाची आंदोलनं चालू आहेत. यावर सरकारकडून एखादी चांगली ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार काय भूमिका घेतंय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. म्हणून हे अधिवेशन महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सर्व सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.”