प्रतिदिनी करोडो प्रवाशांची ने-आण करणारी भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडली आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंदच जुळत नाही. प्रवासी भाडय़ात वाढ करून त्याचा बोजा सर्वसामान्यांवर बसू न देता ही सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करणे, त्याला आधुनिकतेची जोड देणे व प्रवासी जनतेला उत्तमोत्तम सेवा उपलब्ध करून देणे, याला आपण प्राधान्यक्रम देणार आहोत. एकूणच भारतीय रेल्वेला एक नवा लुक देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले.
दरम्यान मी जरी भारताच्या एका मोठय़ा संस्थेचा प्रमुख अर्थात रेल्वेमंत्री असलो तरी कोकणच्या लाल मातीशी असलेली माझी नाळ मी कदापिही तोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोकणचे सुपुत्र, ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा आज येथील स्वा. सावरकर नाटय़गृहात रत्नागिरीकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार समारंभाला खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, जि. प. अध्यक्ष जगदीश राजापकर, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, माजी आमदार बाळ माने व बापूसाहेब खेडेकर, सत्कार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड्. दीपक पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या संयमी भाषणात कुणावरही टीका टिप्पणी न करता केवळ  भारतीय रेल्वेला सुगीचे दिवस कसे आणता येतील यावरच विशेष भर दिला. ते म्हणाले, कोकणी माणूस प्रेमळ आहे, तो काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो. परंतु तोच कोकणी माणूस जेव्हा रागावतो, तेव्हा काय होते, हे आपण सर्वानीच पाहिलेले आहे. मी जरी केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून या देशाच्या एका मोठय़ा आणि महत्त्वाच्या संस्थेचा प्रमुख असलो तरी कोकणच्या लाल मातीशी असलेली माझी नाळ मी कदापिही तोडणार नाही, असा विश्वासही प्रभू यांनी दिला.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वे ही या देशातील एक बलाढय़ संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. तीवर आर्थिक अत्याचार झाले आहेत. प्रतिदिनी करोडो प्रवाशांची ने-आण करणारी भारतीय रेल्वे देशाची रक्तवाहिनी आहे. अशा या संस्थेला नवसंजीवनी देण्याचा माझा प्रयत्न असून या प्रयत्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. प्रवासी भाडेवाढ करून सर्वसामान्य माणसावर त्याचा बोजा लादण्याचा आपला कोणताही विचार नाही आणि म्हणूनच जपानसारख्या प्रगतिशील देशाने त्यांच्याकडील ‘पेन्शन फंडा’ची रक्कम भारतीय रेल्वेत गुंतवावी, असा आमचा प्रयत्न असून, याबाबतची प्राथमिक बोलणी जपानच्या पंतप्रधानांबरोबर झाली असल्याचे प्रभू यांनी सांगितले. ही बोलणी यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांना आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यास निश्चितच सक्षम होईल. देशातील जनतेला सर्वाधिक सेवा देणारी तसेच लाखो लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी संस्था आहे. रेल्वे प्रवाशांना विशेषत: महिलांना सुरक्षितता देण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी जरी केंद्रीय रेल्वेमंत्री असलो तरी येथील लाल मातीशी असलेली माझी नाळ कदापीही तुटणार नाही, तुटू देणार नाही. त्यामुळे कोकणातील उत्पादने, पदार्थ केवळ कोकण रेल्वेमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा माझा संकल्प आहे. कोकण रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प विनाविलंब मार्गी लावण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून ३० कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार कोरेच्या विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी डबे व बोगीच्या उत्पादनासाठी नवीन कारखान्यांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी ही रेल्वे प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण देशभर हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले. सत्कार समारंभाचे अध्यक्ष दीपक करंजीकर यांच्या हस्ते प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी खा. विनायक राऊत, आमदार उदय सामंत तसेच करंजीकर यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रारंभी सत्कार समितीचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले, तर कर्मचारी नेते सुधाकर सावंत यांनी आभार मानले. रत्नागिरीतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक या समारंभाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader