Murlidhar Mohol is New CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीला निवडणुकीत २८८ पैकी २३५ हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आधी चार दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. बिहार पॅटर्न राज्यात राबवावा अशी मागणी शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात येत होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवूनही आता तीन दिवस झाले आहेत. मात्र तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावर निर्णय झाला नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यातील अनेक नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करत आहेत. भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी तर फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यास १००० लोक आत्मदहन करतील, असा इशाराच दिला. एकाबाजूला फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या अनेक बातम्या सूत्रांमार्फत येत असताना. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या बैठकीनंतर विविध चर्चांना उधाण आले. राज्यातील मराठा समाजाचे आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोण असावा? यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली होती.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

c

परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल असतानाही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर करण्यात उशीर होत असल्यामुळे आता विविध नावे समोर आले आहेत. यातच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनीच स्वतःहून भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.”

“आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि संसदीय मंडळात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे”, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will muralidhar mohol be the new chief minister of maharashtra he himself gave an answer to the rumours kvg