MVA in Municiple Corporation Election 2025 : राज्यात विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकला चालो रे चा नारा पुकारला आहे. याबाबतची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली तरीही मुंबई पालिका काबिज करायची असेल तर एकट्याने निवडणूक लढवली पाहिजे, असा सूर या पक्षातील नेत्यांकडून आवळला जातोय. दरम्यान, संजय राऊतांनीही याबाबत आज भाष्य केलं. मुंबईसह १४ महापालिकांमध्ये निवडणूक जिंकण्याकरता शिवसेनेने तयारी सुरू केली असल्याचं आज ते म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीतून फुटून शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं अधोरेखित झालं आहे. यावरून काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
“महापालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू द्या. शिवसेनेने मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू. तीन-साडेतीन वर्षे निवडणुका अडवून ठेवल्या. महापौर दिले नाहीत, कारण त्यांना हरण्याची भीती होती. विधानसभा निवडणुकीत आम्ही वाममार्गाने विजय मिळवू शकतो याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आता महापालिकेच्या निवडणुकांची तयारी केली आहे. पण मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा, मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे, यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> पालिका निवडणुका एप्रिलनंतर, २२ जानेवारीला सुनावणीवर भवितव्य
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“संजय राऊतांच्या देहबोलीतून असं जाणवतंय की त्यांना नैराश्य आलंय. कदाचित या नैराश्येपोटी त्यांनी एकला चालो रे चा नारा दिला असेल. त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्यास तयार आहोत. परंतु, संजय राऊतांच्या भूमिकेसंदर्भात एकदा स्पष्टता आली की आम्ही आमचा निर्णय घेऊ”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
…तर आम्ही स्वबळावर लढू
“तीन वर्षांपूर्वी महानगरपालिका बरखास्त झाली. तीन वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदारसुद्धा आतुर आहेत. कारण सामान्य नागरिकांचे प्रश्न महानगरपालिकेतून सुटतात. कोणाचीही इच्छा नसेल तर आम्ही नागपुरात स्वबळावर निवडणूक लढवणार”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी दिली.
मुंबई महापालिकेची निवडणूक कधी?
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.