लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण येते. अभिनेत्री माधुरी दीक्षित मुंबईतून लोकसभेत उतरणार आणि नाना पाटेकर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एका वृत्तवाहिनीवर बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणाबाबत काही मतं व्यक्त केली होती त्यानंतर सदर चर्चा सुरू झाली. याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांना अमरावती येथे पत्रकारांनी विचारला, त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो…”

एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना नाना पाटेकर यांनी २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालचे सरकार येणार असे म्हटले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविले होते, अशा बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून जाहीरपणे यावर अद्याप भाष्य केलेले नाही. सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस आहे. त्यामुळे ते बराच काळ खडकवासला मतदारसंघात मुक्कामी असतात. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचे नाव जोडण्यात आल्याचे कळते.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांना अमरावती येथे सदर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, खडकवासला मतदारसंघ माझ्या घराजवळ आहे. नाना पाटेकर माझे मित्र आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? हे मी अजिबात ऐकलेले नाही.

आणखी वाचा >> “अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…

यावेळी शरद पवार यांनी वेगवेगळ्या विषयांतील आपली मतं व्यक्त केली. मागच्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी तीन राज्यातील निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. हे खरे आहे. याचा अर्थ आगामी निवडणुकीत आमच्यासमोर अडचणी आहेत, अशी स्थिती नाही. आम्ही एका विचाराने काम केले तर लोक पर्याय म्हणून आम्हाला स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो. आज खऱ्या अर्थाने इंडिया आघाडीने एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नवनीत राणा यांना पाठिंबा?

२०१४ आणि २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. २०१४ साली त्यांचा आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र २०१९ साली त्यांनी विजय मिळविला. यावेळी राणा यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, यावेळेला अमरावतीचा निर्णय महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष एकत्र बसून घेतील. मागच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. तसेच जिल्ह्यातील आमच्या कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ पक्षाकडे हवा आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा करताना त्याबद्दल आमची भूमिका मांडू.

प्रकाश आंबडेकर ‘इंडिया’ येण्यासाठी प्रयत्न

प्रकाश आंबडेकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी प्रयत्न केले, असेही शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत माझ्या शेजारीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे बसले होते. मी त्यांना सुचवले की, प्रकाश आंबेडकर यांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर यावर काही बैठक झाली की नाही? याबाबत मला कल्पना नाही. आमच्या सर्वांची इच्छा आहे की, आंबेडकरांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जावे.

बच्चू कडू यांच्या घरी सदिच्छा भेट

प्रहार संघटनेचे नेते आणि सध्या महायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांनी शरद पवार यांना चहाचे निमंत्रण दिल्यामुळे त्यावर विविध अंदाज वर्तविले जात आहेत. या भेटीमागे काही राजकीय हेतू आहे का? असा प्रश्न माध्यमांनी शरद पवार यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, मी अमरावती जिल्ह्यात दौऱ्यात असताना आमदार बच्चू कडू यांनी मला चहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार मी त्यांच्या घरी जाणार आहे. आमदाराच्या घरी चहा घ्यायला चाललोय, या भेटीमागे कोणताही राजकीय होतू नाही. तसा काही अर्थ काढणे योग्य ठरणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will nana patekar contest election in khadakwasla constituency sharad pawar gave reaction in one word kvg
Show comments