राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्याचा प्रचार करणार नाही. पक्षातीलच इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित बैठक केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील थेरगाव येथे राष्ट्रवादी पक्षाने पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करत राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार हवा असा आग्रह धरला आहे. या बैठकीला आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, इच्छुक उमेदवार नाना काटे, राजेंद्र जगताप, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु, शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे हे राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याची शक्यता दर्शवली जात आहे. राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार हवा असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला. तर, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत पक्षश्रेष्ठी समोर तुमचे म्हणणे मांडले असून पक्ष जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा द्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : नवजात मुलीचे अपहरण झाल्याचा आईचा बनाव, कालव्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड
चिंचवड पोटनिवडणूक जिंकली तर पुढची वाटचाल सोपी आहे. आम्ही तुमच्या भावना विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या पर्यंत पोहचवल्या आहेत. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करायचे आहे. इच्छुकांना उमेदवारी मिळावी ही सर्वांची इच्छा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. महानगरपालिकेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे, ही रंगीत तालीम आहे. महानगर पालिका निवडणुका कधी ही लागू शकतात. ही निवडणूक जिंकली तर महानगर पालिका अवघड नाही. पुन्हा एकदा महानगर पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे, असे अजित गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.