तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांमधील नाराज नेत्यांना बीआरएसने आपल्या पक्षात घेतलं आहे. दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे बीआरएसने पंकजा मुंडे यांनी पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करू. अशी ऑफर बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र समन्वयकांनी दिली आहे. या ऑफरवर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बातचित केली. यावेळी दानवे यांना पंकजा मुंडे यांना आलेल्या ऑफरविषयी विचारण्यात आलं. पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकारून बीआरएसमध्ये जातील का? किंवा त्यांच्या जाण्याने बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील स्थिती सुधारेल का? असे प्रश्न दानवे यांना विचारण्यात आले. यावर दानवे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
अंबादास दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपात आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु एखादं पद मिळालं नाही म्हणून नेतृत्व नाही असं कोणी सांगितलंय.
हे ही वाचा >> “सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुमचंच भूत…”
भाजपात पंकजा मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य बीआरएस नेत्याने केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम हे सगळं करत असल्याचा आरोपही बीआरएसकडून होत आहे.