मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटल्यानंतरही राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता.

आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. पण अद्याप संबंधित १२ आमदारांच्या यादीला मंजुरी देण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र पाठवून संबंधित यादीला मंजुरी देण्याची आठवण करून दिली होती. पण महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली नावं ही त्या-त्या क्षेत्रातील नसल्याचा आक्षेप राज्यपालांनी घेतला होता. हेच कारण देत त्यांनी संबंधित यादी प्रलंबित ठेवली होती.

यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संबंधित १२ जागांसाठी नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. ही यादीत कोणाची वर्णी लागणार आणि राज्यपाल किती दिवसात संबंधित यादीला मंजुरी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची वर्णी लागावी, अशी इच्छा पंकजा मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची आहे. याबाबत प्रश्न विचारला असता भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, “आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांना संधी दिली पाहिजे. पण आमच्या पार्टीत ज्या पद्धतीने निर्णय होतात, त्यानुसार मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, त्यानुसार कार्यकर्त्यांची इच्छा आहे की पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी मिळावी,” असं उत्तर सुरेश धस यांनी दिलं आहे. त्यामुळे या यादीत तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळणार की त्यांना पुन्हा डावलण्यात येणार याबाबत स्पष्ट विधान करणं त्यांनी टाळलं आहे.

Story img Loader