मागील काही काळापासून माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात घेण्याबाबत मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर त्यांचं आम्ही स्वागत करू, अशा आशयाचं विधान खैरे यांनी केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. ठाकरे गटाच्या ऑफरनंतर पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा- भाजप नेत्यांच्या खेळीने मुंडे भगिनी अस्वस्थ
पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य करताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सुरू आहे. मी इथे स्पष्ट सांगतो की, सध्याच्या घडीला पंकजा मुंडे यांना दूर करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे किंवा इतर कोणत्या नेत्यांने पंकजा मुंडेंना दूर केलं असेल.”
हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!
“सध्या भाजपात मुंडे परिवाराला डावलण्याचं काम सुरू आहे, हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पण त्यांना पक्षात घेण्याचा पूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडे यांना बहीण मानलं आहे. त्यामुळे त्यांना ठाकरे गटात घेण्यास काहीच हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.