गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीयात जवळीक वाढत असल्याचं दिसतंय. शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची केलेली पाठराखण असो वा एका घरगुती कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणं असो. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद कायम उमटत असतात. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही भाऊ एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे राजकारणातही हे दोघे एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाहीय. राज जसा तिचा भाऊ आहे, तसा उद्धवही भाऊ आहे”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तसंच, उद्धव आणि राज एकत्र येणार का? असं विचारलं असता शर्मिला ठाकरे यांनी “बघुया…”, एवढंच एका शब्दात उत्तर दिलं.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भावावर विश्वास दाखवला असता तर…”, शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी धारावी पूनर्विकास प्रकल्पावरून जुंपली होती. ठाकरे गटाने धारावीत मोर्चा काढल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. सेटलमेंट झाली नसेल म्हणून मोर्चा काढला असेल अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर, यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर टीका केली. अदाणींचं नाव घेतल्यावर त्यांचे चमचे का बोलतात? असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.

त्याचदरम्यान, आदित्य ठाकरेंविषयी शर्मिला ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंचा सहभाग असले असं मला वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यावरून उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील अनेकांनी शर्मिला ठाकरेंचे आभारही मानले होते.

धारावीचा पूनर्विकासावरून शर्मिला ठाकरेंनीही लगावला होता टोला

अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोव्हिड काही महिन्यांनी सुरू झाला. धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं तर मग तुम्ही तेव्हा निर्णय का घेतला नाहीत? तुम्हाला कुणी अडवलं होतं? चांगले निर्णय घ्यायला तुम्हाला कुणी थांबवलं होतं? आत्ता सगळ्या गोष्टींना कोव्हिडचं कारण देत आहेत. पण कोव्हिड काही महिन्यांनी सुरु झाला त्याआधी चांगला निर्णय घेता आला असता असंही शर्मिला ठाकरेंनी म्हणत टोले लगावले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will raj and uddhav thackeray come together sharmila thackerays answer in one word sgk