महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी काल (६ फेब्रुवारी) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. डिसेंबर महिन्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सातत्याने मनसे सत्ताधाऱ्यांशी भेट घेत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या भेटीबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ मरठीशी संवाद साधला.
“ही आमची सदिच्छा भेट होती. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि मी उपस्थित होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे पक्ष हिंदुत्त्ववादी विचारांचे आहेत. विचारधारेत फारसा फरक नाही. युती करायची नाही की याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतली. हा निर्णय योग्यवेळी ते घेतील”, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांसह मनसेच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. २८ डिसेंबर रोजीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट औपचारिक होती असं त्यावेळी मनसे नेत्यांनी सांगितलं होतं. तर काल झालेली बैठकही सदिच्छा भेट होती, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
तसंच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ती तर नियमित बैठक होत असते”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.