खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खारघर प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यावर आरोप केले आहेत. खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं आयोजन करण्याचं कंत्राट नरेश म्हस्के यांना देण्यात आलं होतं, असं त्यांनी म्हटलं.
सुषमा अंधारेंच्या आरोपावर नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलं आहे. खारघर येथील कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ‘लाईट अँड शेअर’ कंपनीशी माझा कसलाही संबंध असल्याचं सुषमा अंधारे यांनी सिद्ध केलं तर मी याक्षणी राजकारणातून निवृ्त्त होईल, असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं. ते ‘आरएनओ’शी बोलत होते.
सुषमा अंधारेंच्या आरोपांबाबत विचारलं असता नरेश म्हस्के म्हणाले, “सुषमा अंधारे यांनी कायम हिंदू देव-देवतांची विटंबना केली आहे. त्यांचं अध्यात्माशी काहीही देणं-घेणं नाही. या प्रकरणात राजकारण करण्यासाठी त्या श्री सदस्य आणि आयोजकांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ किंवा ‘खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं’, असं सुषमा अंधारे करत आहेत. ‘लाईट अँड शेअर’ कंपनीला जे काम दिल होतं, त्यामध्ये नरेश म्हस्के पार्टनर आहेत, असा खोटा आरोप त्यांनी केला.”
सुषमा अंधारेंना उद्देशून नरेश म्हस्के पुढे म्हणाले, “सुषमाताई, तुम्हाला ज्यांनी ही माहिती दिली, त्यांनी तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी ही माहिती दिली असावी. किंवा खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो, तुम्ही नरेश म्हस्के यांचं ‘लाईट अँड शेअर’ कंपनीशी असलेले संबंध सिद्ध करावेत, तुम्ही आरोप सिद्ध केले तर याक्षणी राजकारणातून निवृत्त होईल, नाहीतर तुम्ही आणि तुम्हाला ज्यांनी माहिती दिली, त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, यासाठी २४ तासांचा कालावधी देतो.”
हेही वाचा- सत्तांतराच्या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?
“आदित्य संवाद , दादरचा दसरा मेळावा , शरद पवार यांचा वाढदिवस, इतर नेत्यांचे विविध कार्यक्रमही ‘लाईट अँड शेअर’ कंपनीकडून आयोजित केले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यक्रमही हीच कंपनी आयोजित करते. एका मराठी तरुणाची ही कंपनी असून तो तरुण ठाण्याचा आहे, पण नरेश म्हस्केंचा याच्याशी काहीही संबंध नाही,” असंही नरेश म्हस्के म्हणाले.