लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णयाच्या निषेधार्थ दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी पुरस्कारासाठी मिळालेल्या दोन्ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला परत करण्याचा निर्णय मंगळवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना जाहीर केला.

पैलवान पाटील म्हणाले की, २००९ मध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत माझ्यावर अन्याय झाल्याची कबुली पैलवान काका पवार यांनी एका वृत्तवाहिनीवरून बोलताना दिली. पंचांच्या निर्णयामुळे आपणास तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ पटकाविण्यापासून वंचित रहावे लागले.

‘‘मी यापूर्वी २००७ व २००८ मध्ये दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली असून २००९ मध्ये तिसऱ्यांदा किताबासाठी मैदानात उतरलो होतो. मात्र, त्या वेळी पंचांच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय झाला. याचा निषेध म्हणून दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून मिळालेल्या दोन्ही गदा येत्या दोन दिवसांत कुस्तीगीर परिषदेला परत करणार आहे,’’ असेही पाटील म्हणाले. सोमवारी शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्याच्या घटनेवरून चंद्रहार यांनी संतप्त भावना व्यक्त केली होती. पंचांच्या निर्णयावर ते पुन्हा आक्रमक झाल्याचे मंगळवारी दिसून आले.

Story img Loader