काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली. आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत, त्यामुळे अपक्षच राहणार. तसेच मी अजून काँग्रेस पक्ष सोडला नाही, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच केलेल्या एका ट्वीटमुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण यावर आता सत्यजीत तांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आपण एका शाळेला भेट दिली असता, तेथील एका विद्यार्थ्याने कविता म्हटली होती. तिच चारोळी आपण ट्वीट केली, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

हेही वाचा- “शरद पवार असं धोकेबाज…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं थेट विधान!

पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सत्यजीत तांबे म्हणाले, “मी काल एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गेलो होतो. तिथे एका विद्यार्थ्याने कविता वाचली. ती कविता मला आवडली, म्हणून मी ते ट्वीट केलं. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची काहीही गरज नाही.”

तांबेंनी नेमकं ट्वीट काय केलं होतं?

सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी… घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…” सत्यजीत तांबे यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, असा अंदाज लावला जात होता. पण आता यावर सत्यजीत तांबे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will satyajit tambe join bjp explaination on viral tweet congress nashik rmm
Show comments