Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात अतिप्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे पाठवली जात आहे. देशभरातील अनेक नेत्यांनाही आमंत्रणे पोहोचली असल्याने तेही या कार्यक्रमाला येणार आहेत. आता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आलं आहे. हे आमंत्रण स्वीकारल्याचं पत्रही शरद पवारांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी अयोध्येत केव्हा येणार याबाबतची माहिती दिली आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देशभरातील नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत. तसंच, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली. परंतु, राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असल्याने आम्ही या सोहळ्याला येऊ शकत नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली. तसंच, उद्धव ठाकरे यांना आमंत्रणच आलं नसल्याने ते या सोहळ्याला जाणार नाहीत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. तसंच, राज्यसभेतील खासदार आहेत. त्यामुळे त्यांना आमंत्रण प्राप्त झालं आहे. हे आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी पत्राची पोचपावती म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आभारपर पत्र लिहिले आहे.
हेही वाचा >> “राम मंदिराच्या नावे काँग्रेसने मतपेटीचं राजकारण केलं, १९८९ मध्ये…”; योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य
पत्रात काय म्हणाले शरद पवार?
या पत्रात शरद पवार म्हणाले, दिनांक २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले. यासाठी मी खूप आभारी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भारतातच नाहीत तर संपूर्ण जगभर पसरलेल्या भक्तांसाठी श्रद्धा आणि आस्थेचे प्रतिक आहे. अयोध्येतील सोहळ्यासाठी रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहेत. अनेक रामभक्त तिथे मोठ्या संख्यने उपस्थित राहतील. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर श्री रामाचे दर्शन सहज आणि आरामदायी घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईन तेव्हा श्रद्धापूर्वक रामाचं दर्शन घेईन. तोवर राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल. तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार करा.
या पत्रानुसार शरद पवार २२ जानेवोरी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तसंच, राम मंदिरांचं बांधकाम पूर्ण झाल्यावरच ते अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. इंडिया आघाडीतील अनेक घटकपक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यानंतर आता शरद पवारांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं आहे.