अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. येत्या १५ ते २० दिवसांत चमत्कार दिसेल, शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. आमदार राणा यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या १५ ते २० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील, या रवी राणांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता यशोमती ठाकुर म्हणाल्या, “ती वेडी माणसं आहेत. त्यांच्यावर मला कशाला प्रतिक्रिया द्यायला लावता. शरद पवारांबद्दल विचारत असाल, तर ते एका विचाराबरोबर नेहमी राहिले आहेत. ते काँग्रेसमधून बाहेर पडले. मात्र ते कधीही दुसऱ्या विचाराबरोबर गेले नाहीत.”
हेही वाचा- “अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर…”, गुणरत्न सदावर्तेंचं विधान
“शरद पवार नेहमीच सर्वधर्म समभाव या विचारांबरोबर राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपाला समर्थन देतील, असं मला तरी वाटत नाही. कुणीही काहीही वायफळ बोलायचं आणि त्याच्यावर मग आम्ही प्रतिक्रिया द्यायची. याची काही गरज आहे,” असंही यशोमती ठाकुर म्हणाल्या. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
हेही वाचा- “दबाव आणण्यासाठी नाक दाबून…”, रोहित पवारांवरील कारवाईवर यशोमती ठाकुर यांची प्रतिक्रिया
रवी राणा यांनी नेमका दावा काय केला?
रवी राणा यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या आहेत. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, मी अनेक ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. ज्याठिकाणी गेलो तिकडे गणपतीला एकच सांगितले की, देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली पाहिजे. हा चमत्कार १५-२० दिवसांत दिसेल. लवकरच राज्यात आणि केंद्रात शरद पवारांच्या पाठिंब्याचं मजबूत मोदी सरकार दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला.