समीर जावळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेत केला. तसंच काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार असं म्हणाले होते की, निवडणुकीनंतर येत्या दोन वर्षांत अनेक छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. शरद पवारांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर शशी थरुर यांनी तर रेड कार्पेट टाकून आम्ही तयार आहोत असं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आणि विलीनीकरण्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र इतिहासात डोकावून पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म १९९९ मध्ये सोनिया गांधींना विरोध दर्शवत झाला आहे. याचा उल्लेख अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात केला होता.

मविआचा प्रयोग आणि फोडाफोडी

महाराष्ट्राच्या राजकारणातला महाविकास आघाडीचा प्रयोग हा शरद पवारांची पकड अजूनही राजकारणावर आहे, हे दाखवणारा ठरला होता. भाजपा आणि शिवसेनेचा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरुन घटस्फोट झाल्यानंतर शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेस अशी विळ्या- भोपळ्याची मोट बांधून दाखवली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पण सत्तेचा रिमोट मात्र शरद पवारांच्याच हाती होता. दुसरीकडे भाजपाने अडीच वर्षे वाट पाहिली, करोना काळ संपू दिला आणि त्यानंतर आधी शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यामुळे शरद पवारांना एक प्रकारे धोबीपछाडच मिळाला. हा धोबीपछाड देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे पंखही भाजपाने उपमुख्यमंत्री पद देत छाटले. असं सगळं असलं तरीही फडणवीस हे शरद पवारांना पुरुन उरलेत अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसंच या फोडाफोडीला नावं ठेवली जात असली आणि दूषणं दिली जात असली तरीही राज्यात फोडाफोडाची सुरुवात करणारे शरद पवारच आहेत असं वक्तव्य नुकतंच राज ठाकरेंनीही केलं. पुलोदच्या प्रयोगानंतर काँग्रेसबरोब गेलेले शरद पवार आणि त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी केलेलं बंड तसंच त्यातून झालेला राष्ट्रवादीचा जन्म हे त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे आहेत.

हे पण वाचा- “…तर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील”, शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

काय घडलं होतं १९९९ मध्ये?

१९९९ मध्ये १२ वी लोकसभा बरखास्त झाली आणि १३ व्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली. सोनिया गांधी या विदेशी असल्याचा मुद्दा त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये चर्चेत आला. हा मुद्दा काढणारे पी. ए. संगमा, तारीक अन्वर आणि शरद पवार हे तीन नेते होते. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा, पक्षात त्यावेळी चांगलं वजन असलेले तारिक अन्वर आणि शरद पवार यांनी सोनिया गांधी ‘विदेशी’ हा मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेस आणला. त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत कलह बाहेर आला. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यानंतर काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद सीताराम केसरींकडे आलं होतं. मात्र सोनिया गांधींना अध्यक्ष करण्यासाठी त्यांना पद सोडावं लागलं त्यामुळे त्या काळात तेदेखील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सोनिया गांधी यांचं संग्रहित छायाचित्र (फोटो-ANI)

शरद पवारांनी हे का केलं?

शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं ही त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध दर्शवण्याचं कारण आणि त्या विदेशी वंशाच्या असल्याचा मुद्दा बाहेर काढण्याचं मुख्य कारण हेच होतं. १९९९ मध्ये सोनिया गांधी राजकारणात नवख्या होत्या. त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी बसावं हे शरद पवारांना मुळीच वाटत नव्हतं. सोनिया गांधींमध्ये तेवढी राजकीय क्षमता आणि परिपक्वता नाही असं तेव्हा शरद पवारांचं मत होतं. त्यामुळे शरद पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा बाहेर काढला. पक्षात बंडाळी माजेल आणि आपल्याला पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटलं होतं. मात्र शरद पवारांचं बंड फसलं. काँग्रेसचे जुने जाणते नेते हे मॅडम सोनियांबरोबरच राहिले. तसंच हे बंड फसल्याचा दुसरा परिणाम असा झाला की तारिक अन्वर, पी. ए. संगमा आणि शरद पवार या तिन्ही दिग्गजांची हकालपट्टी काँग्रेसने केली. शरद पवारांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत केली होती. त्यामुळे गांधी-नेहरुंच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत असं म्हणत त्यांनी १० जून १९९९ या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. शरद पवारांना अनपेक्षित असा करीश्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळी करुन दाखवला. मात्र ऑक्टोबर १९९९ मध्येच शरद पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा बाजूला ठेवला आणि पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्याचा उल्लेख नुकताच अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात केला होता.

शरद पवार यांनी केलेलं बंड तेव्हा चर्चेत आलं होतं. (फोटो-X)

हे पण वाचा- शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया, “आम्ही तर रेड कार्पेट अंथरुन..”

काय म्हणाले होते अजित पवार?

“१९९९ ला शरद पवारांनी असा मुद्दा काढला की सोनिया गांधी विदेशी आहेत. राजीव गांधींच्या त्या पत्नी असल्या तरीही विदेशी वंशाच्या आहेत. आपल्या देशात जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नाही असं कसं चालेल? असा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. संगमा, तारिक अन्वर आणि शरद पवारांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. हे सगळं आपण पाहिलं. ऑक्टोबर १९९९ मध्ये सांगितलं काँग्रेस बरोबर जायचं होतं त्यामुळे सोनिया गांधींचा विदेशी असण्याचा मुद्दा शरद पवारांनीच सोडून दिला. तेव्हा आम्ही काही बोलू शकलो नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती.

सोनिया गांधींनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद सोडलं होतं ते घेतलं नाही

“राजकारणात हे सगळं घडत असताना नंतरच्या काळात २००४ मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. मला विलासराव देशमुख म्हणाले की तुमचा मुख्यमंत्री कोण ? मला मॅडमनी (सोनिया गांधी) सांगितलं की आपला मुख्यमंत्रीपदावर दावा नाही. आपण उपमुख्यमंत्रीपद घेऊ. पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. चार मंत्रिपदं वाढवून घेतली. आदेश तेव्हाही आम्ही ऐकला. आत्ता जे केलंय ते २००४ ला केलं असतं खूप बरं झालं असतं. आता काय करणार?” असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसची सद्यस्थिती काय?

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकलं झाली आहेत. ४० हून जास्त आमदार हे अजित पवारांसह आहेत. अजित पवारांनी महायुतीला साथ दिली आहे. तसंच राज्य सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ हे अजित पवारांना दिलं आहे. तर शरद पवारांनी पक्षात बंड झाल्यापासून पक्षाची बांधणी नव्याने सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलं आहे. नुकतीच बारामतीची लोकसभा निवडणूक पार पडली आहे. ज्या निवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे एकमेकींच्या विरोधात लढल्या आहेत. या लढाईकडे अजित पवार विरुद्ध शरद पवार असंच पाहिलं जातं आहे. ४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्यानंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२४ वर्षांत राष्ट्रवादीची दोन शकलं

सोनिया गांधींना विरोध दर्शवून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. १० जून १९९९ ला या पक्षाची स्थापना झाली. मात्र त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत विदेशीपणाचा मुद्दा बाजूला ठेवून शरद पवार काँग्रेसबरोबर गेले. पक्षाला २४ वर्षे पूर्ण झाली तेव्हा पक्ष फुटला आहे. त्यामुळे शरद पवार त्यांच्याकडे उरलेला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.