Will Sharad Pawar take Ajit Pawar again? : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या. सत्ता पाडून नवं सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष फोडेपर्यंत अनेक प्रयोग राजकारणात राबवले गेले. यामुळे भिन्न विचारधारा असलेली नेतेमंडळीही सत्तेसाठी एकत्र आलीत. पक्ष फोडून किंवा पक्षात दुभंग निर्माण करून जे नेते बाहेर पडले त्यांना पुन्हा पक्षात घेणार की नाही अशी चर्चाही वारंवार राजकारणात घडताना दिसते. दरम्यान, अजित पवारांना शरद पवार माफ करणार का? त्यांना ते पुन्हा स्वीकारणार का? असेही असंख्य प्रश्न निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत. यावर त्यांनी सूचक विधान केलं आहे. ते बोल भिडूने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार वेगळा निर्णय घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय. त्यामुळे अशा परिस्थितीत अजित पवार जर शरद पवारांकडे पुन्हा आले तर ते त्यांना माफ करतील का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “हा काही माफी मागण्याचा किंवा कुणाला दोषी ठरवण्याचा प्रश्न नाही. प्रश्न आहे विचारधारेचा. आज ज्यांच्या मताची विचारधारा आम्हाला मंजूर नाही, आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही असं म्हणता येणार नाही, कारण ५-५ वेळेला आमच्या विचारधारेचा आणि आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन सत्तेत बसले. आता आमचं धोरण काही बदललंय असं काही नाहीय. त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेला आमचा सक्त विरोध आहे, त्यांच्याबरोबर जाऊन बसणं आणि त्यांच्यासोबत काम करणे ही भूमिका असेल तर कुणालाच प्रवेश नाही. विचारधारेची भिन्नता असेल तर अजित पवार काय कुणालाच प्रवेश नाही. हे नसेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवणूक केली जाणार नाही”, असं शरद पवार म्हणालेत.

हेही वाचा >> Ajit Pawar : शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?, अजित पवार म्हणाले, “आमचं नातं..”

म्हणजेच, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या विचारांची कास धरली तर त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील, असा यातून सूचक अर्थ निघू शकतो.

येत्या विधानसभेत किती आमदार निवडून येतील

“आतापर्यंत माझा अनुभव आहे लोक निवडून येतात, पक्ष सोडून जातात. असं दोन तीन वेळेला घडलं आहे. जे सोडून गेले त्यांची संख्या ४०-४५ असायची. पंरतु, त्यानंतरच्या निवडणुकीत जे लोक सोडून गेलेत ते काही फार मोठ्या प्रमाणात निवडून आले नाहीत. तसंच, त्याच्या पुढच्या निवडणुकीत आमच्या दोन तीन जागा जास्त निवडून येतात. आता ५० ते ६० जागा जिंकून येतील, असं वातावरण दिसतंय”, असंही शरद पवार म्हणाले.

आताच्या निवडणुकीत पैशांचा अतिरिक्त वापर

आघाडीची जी स्थिती होती, त्या सगळ्या जागा आपल्याला रिटेन व्हायला हरकत नाही. ही पहिली निवडणूक अशी पाहत आहे की सत्ताधारी पक्षाने प्रचंड साधनसामग्र,पैसा याचा वापर केलेला आहे. यापूर्वी एवढा वापर पैशांचा झाला नव्हता. परंतु, यावेळी जास्त झाला. आत त्याचा परिणाम किती होतोय ते बघायचंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sharad pawar take ajit pawar again important indications by sharad pawar sgk