आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्व खासदार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत सूचक विधान केलं होतं. यावर आता विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. संबंधित माहिती चुकीची आहे, असं विधान शिरसाट यांनी केलं ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटाचे खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “तुम्ही तुमचा स्त्रोत कुठून आणला? हे मला माहीत नाही. पण कमळाच्या चिन्हावर शिवसेनेचे खासदार निवडणूक लढणार, अशी जी बातमी चालू आहे, ती मुळात चुकीची आहे. प्रसारमाध्यमंही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातम्या चालवतात आणि भुंकणाऱ्यांना भुंकायला संधी मिळते. मग ते भुंकायला सुरुवात करतात. मग त्यांना निष्ठा येते. त्यांना सगळं आठवतं.”

संजय शिरसाटांनी पुढे नमूद केलं, “मुळात शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे. रडायला शिकवलं नाही. त्यामुळे आमचे सर्व खासदार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. यात काही शंका नाही. आम्ही भाजपाबरोबरची २५ वर्षांची युती पुन्हा सुरू केली.”

हेही वाचा- “रोहित पवार हा बिनडोक माणूस”, युवा संघर्ष यात्रेवरून गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

“आम्हाला तिकडे जायचं असतं किंवा आम्हाला त्यांच्या (भाजपा) चिन्हावर लढायचं असतं तर एवढा खटाटोप करायची गरज काय होती? आम्ही निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयात गेलो नसतो. आम्ही थेट भाजपात सामील झालो असतो. पण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिलेली शिकवण आणि विचार जोपासायचे आहेत. त्यामुळे आमचा पक्ष कधीही भाजपात विलीन होणार नाही आणि त्यांच्या चिन्हावरही निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो,” असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will shinde faction mp contest election over bjp symbol sanjay shirsat reaction rmm