ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अमरावती दौऱ्यावर गेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेण्याचं काम सुषमा अंधारेंकडून केलं जात आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघातून सुषमा अंधारे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता स्वत: सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. सुतावरून स्वर्ग गाठू नका. अमरावतीतून निवडणूक लढण्याची शून्य टक्केही शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली. अमरावतीत ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- “काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी होणार असून आम्ही…”, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “मागील तीन महिन्यातला माझा हा तिसरा अमरावती दौरा आहे. पण सुतावरून स्वर्ग गाठू नका. सुषमा अंधारे अमरावतीतून निवडणूक लढणार आहे, अशा चुकीच्या बातम्या कुणीतरी दिल्या आहेत. अमरावतीतून निवडणूक लढण्याची शून्य टक्केही शक्यता नाही. अमरावतीत आम्हाला निश्चितपणे पोषक वातावरण आहे. त्यामुळे मी इकडे येत आहे. बाकी येथे उमेदवार कोण असेल? हे नंतर ठरवलं जाईल. पण आम्ही अमरावतीमध्ये फार जातीने लक्ष घालतोय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अमरावतीत पक्षबांधणीचं काम सुरू आहे.”
हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा
खासदार नवनीत राणा यांच्याशी सुरू असलेल्या वादावर सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “आम्हाला कुणाशी वाद वगैरे घालायचा नाही. पण नवनीत अक्का (खासदार नवनीत राणा) हनुमान चालीसाच्या प्रेमात जास्त पडल्या आहेत. आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की, हनुमान चालीसा असेल किंवा कोणताही ग्रंथ, अभंग, श्लोक, कुराण किंवा आयात जे काही असेल ते पाठ असणं म्हणजे खासदार होण्याची पात्रता असू शकत नाही. खासदार होण्यासाठी किंवा खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला तिथल्या जनमाणसाचे प्रश्न कळले पाहिजेत. हे जास्त गरजेचं असतं. एवढीच गोष्ट आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकी त्यांच्याशी माझा काहीही वाद नाहीये.”