एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच चर्चेवर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेजस ठाकरे राजकारण आले तर यात काही नवीन असल्याचे वाटून घेण्याची गरज नाही, असे दानवे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला भेटू! संभाजी छत्रपतींचे सूचक ट्वीट, मोठी घोषणा करणार?
उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमातही ते दिसत नाहीत. मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे कोल्हापुरात एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. कोल्हापूर दौरा संपल्यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आता तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी चर्चा सुरू आहे. याच चर्चेवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार की नाही याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तसेच तेजस ठाकरे राजकारणात आले तर त्यात नवे वाटून घेण्याची गरज नाही, असे सूचक विधान केले.
हेही वाचा >> “बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू” शिवसेना नेत्याचे विधान
दरम्यान, शिवसेनेच्या पुर्नबांधणीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांनी आपल्या शिरावर घेतली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तसेच बंडखोरांवर कठोर टीका करून ते पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीदेखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचे सांगितलेले आहे.