दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्राध्यापकांच्या भरतीत अनुचित प्रकारांची दखल

विश्वास पवार

प्राध्यापकांच्या भरतीत झालेल्या अनुचित प्रकारांची गांभीर्याने दखल घेत रयत शिक्षण संस्थेतील दोन पदाधिकाऱ्यांचे तातडीने राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याने संस्थेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात मागील वर्षी प्राध्यापकांची भरती झाली. त्या वेळी निवड समितीत अनेक प्राचार्याचा समावेश होता. ज्या प्राध्यापकांनी संस्थेसाठी काम केलं, त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून ‘भलत्याच’ प्राध्यापकांची रयतमध्ये निवड केल्याचा आरोप झाला. त्यामुळेच जे पात्र होते, ज्यांची सेवाज्येष्ठता होती, त्यांना डावललं म्हणजे काही तरी आर्थिक गडबड आहे असा काही सदस्यांचा आरोप आहे. मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाच्या कामाबाबत तक्रार होती. मागील वीस ते पंचवीस वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळालेले नाहीत. संस्थेमध्ये लेखापाल विभागाप्रमाणे, निवृत्तीवेतन विभाग सुरू करण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व तक्रारीची दखल घेण्यात यावी, संस्थेमध्ये मागील दोन वर्षांमध्ये प्राध्यापक व शिक्षक भरती करण्यात आली होती. या नोकर भरतीमध्ये अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रोरी थेट अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आल्या. तक्रारींची गंभीर दखल घेत पवार यांनी कार्यकारी मंडळाच्या काही सदस्यांना पुणे येथे बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून तक्रारींबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर संस्थेचे माजी सचिव ,आजन्म सेवक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भाऊसाहेब कराळे आणि डॉ अरविंद बुरुंगले यांनाही पुणे येथे बोलावण्यात आले होते. त्यावेळी भाऊसाहेब कराळे यांच्याशी चर्चेत माझ्यापर्यंत आलेल्या तक्रारी आणि घडलेले प्रकार गंभीर आहेत,’ असे सांगत पवारांनी कराळेंना राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. बुरुंगले या बैठकीस नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषय साताऱ्यात पुढे आला. त्यांना कामकाजाबाबत समज देऊन व परिणामांची जाणीव करून देत त्यांचा राजीनामा घेतला.

शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून पद्म्भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची स्थापना केली. ‘स्वावलंबी शिक्षण’ हे ब्रीद व ‘कमवा आणि शिका’ या मूलमंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी देश-परदेशात यशाची अनेक छोटी-मोठी शिखरे पादाक्रांत केली आहेत.

रयत शिक्षण संस्थेने नुकतीच आपली शंभरी पूर्ण केली आहे. सुरुवातीला भाऊराव पाटील यांनी मुलांच्या शिकवण्यातून मिळणाऱ्या पैशांतून संस्थेची स्थापना केली आणि रोपटय़ाचा वटवृक्ष बनला. सध्या शरद पवार हे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

सध्या १५ जिल्हे, महाराष्ट्र आणि कर्नाटकात अशा दोन राज्यांत संस्थेचा विस्तार आहे. संस्थेची महाराष्ट्रात ४१ महाविद्यालये, ४३९  शाळा, मुलांसाठी २७ वसतिगृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी. एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेतल्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, ५८ आयटीआय व इतर. एकूण शाखा ७३९ ,एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख व सेवक १६,९४८ आहेत.

केवळ दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी काय फरक पडणार, असा प्रश्न पडू शकतो. संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि परिस्थिती पाहता खुद्द शरद पवारांना साताऱ्यात यावं लागणं यावरून या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते.

संस्थेच्या कामकाजाबाबत प्रशासन, कर्मचाऱ्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांवर अंतर्गत वाद आणि गंभीर आरोप होऊ लागल्याने व नोकर भरतीच्या अनुषंगाने पहिल्यांदाच निनावी तक्रार आल्यामुळे पवार नाराज झाले.

नोकर भरतीच्या अनुषंगाने जे निनावी पत्र पवारांच्या हाती पडले ते फक्त अहमदनगर केंद्राचे होते. त्यामुळे सातारा, सांगली, पुणे आणि पनवेल केंद्रात असे काही प्रकार घडले आहेत काय याबाबत शोध घेण्यास त्यांनी सांगितले.

या साऱ्या घडामोडींबाबत कार्याध्यक्ष असलेले कर्मवीर अण्णांचे नातू अनिल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राजीनामा दिलेले डॉ. कराळे म्हणाले, आपण तीन महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला असून, संस्थेकडून त्याबाबतचा कोणताही निर्णय मला अद्याप कळविण्यात आलेला नाही. डॉ. बुरुंगले म्हणाले, होय, मी राजीनामा दिलेला आहे. काही गट-तट आहेत. माझ्यावर ठपका काय आहे, ते संस्थाच सांगू शकेल,पण मला ताणतणाव काही नको होते. मी राजीनामा दिला आहे.

* केवळ दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी काय फरक पडणार, असा प्रश्न पडू शकतो.

* संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा घेणं आणि परिस्थिती पाहता खुद्द शरद पवारांना साताऱ्यात यावं लागणं यावरून या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येऊ शकते.

Story img Loader