पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. अनेक पक्ष एकत्र आल्याने राज्या-राज्यांत जागा वाटप करताना सर्वच पक्षांना काही जागांचा त्याग करावा लागणार आहे. तसंच, मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पक्षांनाही हाताशी घ्यावं लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीही इंडिया आघाडीत सामिल होण्यास इच्छुक आहे. परंतु, काँग्रेसबरोबर असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे हे गणित जुळत नसल्याचं दिसतंय. परंतु, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागा वाटप विसरून सगळ्यांनी मोदींविरोधात एकत्र यायला हवं, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल (२५ डिसेंबर) नागपुरात आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनामुळे तेही इंडिया आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. वंचितने महाराष्ट्रात ठाकरे गटाबरोबर सख्य जमवलं असलं तरीही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत त्यांना अधिकृत स्थान मिळालेलं नाही. याबाबत चर्चा होणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> “…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाहीत”, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला टोला

“आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याकरता काँग्रसेने समिती स्थापन केली आहे. या समितीत सर्व राज्यनिहाय आघाडी अपेक्षित आहे. त्यावर २९ डिसेंबरपासून चर्चा होणार आहे. आमची सकारात्मक भूमिका आहे. माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांनाही आघाडीत घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात मतांचं विभाजन टाळता येईल. भाजपाविरोधात सक्षम पर्याय महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकर आणि इतर समविचारी पक्ष ठरू शकतो. त्यामुळे जागा वाटपात त्यांना (वंचितला) सामावून घेता येऊ शकतं, असं माझं मत आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> मानगुटीवरील ‘भूत’ उतरविण्यास प्राधान्य द्या; प्रकाश आंबेडकर यांचा ‘इंडिया’ आघाडीला सल्ला

“काँग्रेस अखिल भारतीय समितीची २९ डिसेंबरला जागा वाटसंदर्भात बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात धोरण ठरवलं जाईल. ही पक्षनिहाय बैठक असेल. प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी बोलावून त्यांची मते लक्षात घेऊन अंतिम स्वरुप करता येईल”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will vanchit get a place in india aghadi ashok chavan said my personal comment is that sgk