मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला आहे. त्यांच्यामागे महाराष्ट्रातील मराठा समाजातील हजारो लोक पाठीशी आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता राजकारणात यावं या मागणीला जोर धरलाय. तसंच, इम्तियाज जलील यांनीही अशीच मागणी केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आगामी काळात राजकारणात उतरणार का? आणि उतरले तर त्यांच्या पाठिशी समाज उभा राहणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनीच उत्तर दिलंय. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.
“आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. ही पोरं मोठी झाली पाहिजेत, असं आम्हाला वाटतं. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध झालं आहे. लोकांचा समज होता की आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचं कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणं. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“लोक मांड्या थोपटून सांगायला लागले आहेत की आंदोलनात ताकद आहे. राजकारण हा आमचा मार्ग नाही. आम्ही राजकारणाबाबत चीड असणारे लोक आहोत. जनआंदोलनामुळे गोर गरिबांना न्याय मिळतो, राजकारणाकडे माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही”, असंही मनोज जरांगे म्हणाले.
इम्तियाज जलील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आणि मराठा समाजासाठी जनळवळ उभी करावी. मुस्लीम समाज आणि मराठा समाज आपण एकत्र आणू आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू”, असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं.