मनसेचे सरचिटणीस आणि पुण्यातले मनसेचे बडे नेते अशी ख्याती असलेल्या वसंत मोरेंनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. फेसबुक पेजवर राज ठाकरेंच्या फोटोला नमस्कार करत आणि साष्टांग नमस्कार घालत दोन फोटो वसंत मोरेंनी पोस्ट केले आहेत. त्यानंतर त्यांनी मी पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करतो आहे असं म्हणत राजीनामा दिला आहे. तसंच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांच्यासह जाणार का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले वसंत मोरे?

“मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं. पुणे शहरांतला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो. आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो. मात्र आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्याविरोधात कारवाया वाढल्या. इच्छुकांची यादी पक्षातली वाढली. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या. नकारात्मक अहवाल माझ्याविरोधात पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं.

माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला

“मी एकनिष्ठ राहिलो पण माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. मी ज्यांच्यासह १५ वर्षे घालवली तेच लोक वसंत मोरेला तिकिट मिळू नये म्हणून अहवाल पाठवत असतील तर काम कसं करणार? त्यामुळे मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत. मी सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो, पण नेत्यांचा फोन घेतला नाही. हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. मी अशा लोकांमध्ये कसा काय राहणार?” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी दिल्यावर साश्रू नयनांनी पहिली प्रतिक्रिया, “सहनशक्तीचा कडेलोट…”

शरद पवारांसह जाणार का?

आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांसह जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर वसंत मोरेंनी दिलं आहे. ” मी शरद पवारांची भेट घेतली. ती बारामतीच्या विकासकामांच्या संदर्भात घेतली होती. सुप्रिया सुळेंशी मी चर्चा केली ती देखील याच विषयावर. त्यांच्याशी मी पक्षप्रवेशाबाबत काहीही बोललो नाही. शरद पवारांशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांच्या पक्षात जाण्याबद्दल चर्चा केली नाही. मी येत्या दोन ते तीन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन. मला इतर पक्षांनीही ऑफर दिली आहे. मी काय करायचं हे अद्याप ठरवलेलं नाही. आज मी पक्ष सोडला आहे.” असं उत्तर वसंत मोरेंनी दिलं आहे.