भाजपाचा मेळावा ४ मार्च या दिवशी नागपूरमध्ये आहे. या मेळाव्यात अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. आज याविषयी नवनीत राणा यांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा म्हणाल्या आम्ही एनडीएबरोबर आहोतच त्यामध्ये त्यामुळे यात काही नवल वाटण्यासारखं नाही. सोमवारी नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून मी सोमवारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत? काय बोलत आहेत? यामध्ये मी पडणार नाही. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही.” असं नवनीत राणा म्हणाल्या. अमरावती या ठिकाणी नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
भाजपात प्रवेश करणार का?
“मी आणि रवी राणा भाजपात जाणार ही चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो. तसंच आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो. भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणा यांनी थेट प्रतिक्रिया देत सूचक संकेतही दिले आहेत. आता उद्या नागपूरच्या मेळाव्यात काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नवनीत राणा कोण आहेत?
मुंबईत जन्मलेल्या नवनीत राणा यांना लहान वयापासूनच मॉडेलिंगची आवड होती. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शिक्षण सोडलं आणि त्या मॉडेलिंग करु लागल्या होत्या. या दरम्यान नवनीत राणा मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकल्या. तसंच नवनीत राणांनी काही काळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही देखील आपली कारकीर्द घडवली. नवनीत राणा यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबी वंशाचे आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. १२ वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सहा म्युझिक व्हिडिओमध्ये मॉडेल म्हणून दिसल्या होत्या. ‘दर्शन’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी आपल्या सिनेकरिअरची सुरुवात केली होती.
२०११ मध्ये नवनीत राणांनी अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केलं. रवी राणांशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा राजकारणात आल्या. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना जोरदार टक्कर दिली होती. पण तेव्हा त्यांना विजय मिळवता आला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. नवनीत राणा आणि रवी राणा हे महायुती सरकार असताना हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मातोश्रीला जाणार होते. ते मुंबईत पोहचले तेव्हा बराच राडा झाला होता. त्यानंतर या दोघांना काही दिवस तुरुंगवासही भोगावा लागला होता. आता भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावर नवनीत राणांनी सूचक विधान केलं आहे.