What Praful Patel Said About Sharad Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आहे. माझ्यासह संपूर्ण पक्ष आहे आणि सगळ्यांच्या सहमतीनेच मी सरकारमध्ये सहभागी झालोय असं त्यांनी म्हटलं आहे. तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल हेदेखील अजित पवारांसह दिसले. रविवारी हे बंड झाल्यानंतर आज सोमवारी गुरु पौर्णिमा आहे. यानिमित्ताने तुम्ही तुमचे गुरु शरद पवार यांना भेटणार का? या प्रश्नावर पटेल यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी?
“शरद पवार हे माझे गुरु आहेत. मी नेहमीच त्यांचा आशीर्वाद घेतो. आजही त्यांचा आशीर्वाद घेईन” असं उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी अजित पवारांसह बंडखोरी केली. तसंच शरद पवार हे माझे गुरु असून आज त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचं सांगितलं.
शरद पवारांनी जेव्हा रविवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की मी कुणावरही नाराज नाही. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही चुकीच्या मार्गाने गेले आहेत. मी स्वतः कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. मात्र या दोघांनीही चुकीचा मार्ग निवडला अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी रविवारी दुपारी शपथ घेतली. महाराष्ट्रात झालेला हा तिसरा राजकीय भूकंप ठरला.
अजित पवार जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासह जाणार नाहीत. मात्र काही वेळातच प्रफुल्ल पटेलही तिथे दिसलेच. त्यांना या कार्यक्रमात पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. अजित पवारांनी जो निर्णय घेतला त्यात प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना साथ दिल्याचं पाहण्यास मिळालं. त्यानंतर आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने तुम्ही त्यांना भेटणार का? हे विचारलं असता शरद पवार माझे गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद मी नेहमीच घेत असतो असं उत्तर पटेल यांनी दिलं आहे.