लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राज्यातील शत-प्रतिशत यशाला केवळ नांदेड अडसर ठरले. मोदी लाटेतही नांदेडची जागा काँग्रेसने कायम राखल्यानंतर अशोक चव्हाण समर्थक ‘आनंद धून’ सादर करीत असताना, भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र नजीकच्या काळात संभाव्य पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल, असा सूर लावला आहे.
भाजपने महाराष्ट्रात २४ उमेदवार उभे केले, त्यात केवळ नांदेडचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पक्षाचे राज्यातील शत-प्रतिशत हुकले. भाजपतर्फे डी. बी. पाटील यांची उमेदवारी लादणारे गोपीनाथ मुंडे यांनी नांदेडच्या पराभवावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही वा त्यांना भेटण्यास नांदेडहून गेलेल्या कार्यकर्त्यांकडे साधी विचारणाही केली नाही. मतमोजणीपूर्वी भाजप पदाधिकारी व उमेदवारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत मुंडे यांनी नांदेडची जागा येणारच, असे ठाम सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर मतमोजणीनंतर नांदेडच्या काही पत्रकारांनी माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधला. पक्षाचे ‘शत-प्रतिशत’ नांदेडने थांबविले, याकडे लक्ष वेधले असता भंडारी यांनी, फार काळजी करण्याचे काही नाही. पुढील काही महिन्यांत नांदेडची पोटनिवडणूक होईल, तेव्हा आम्हीच जिंकू, अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण विजयी झाले असले, तरी डॉ. माधव किन्हाळकर यांनी त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रक्रिया होत असून, हे प्रकरण ४५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आयोगाने पहिली सुनावणी २३ मे रोजी निश्चित केली आहे. २० जूनपर्यंत या प्रकरणी आयोगाचा निकाल अपेक्षित असून तो चव्हाण यांच्याविरुद्ध जाईल, असे गृहीत धरून भाजपने पोटनिवडणुकीची भाषा सुरू केली आहे. पक्षाचे उमेदवार डी. बी. पाटील यांनी तर पोटनिवडणूक झाल्यास आपणच उमेदवार, असे जाहीर करून टाकले आहे.
निवडून आल्यानंतर चव्हाण दुसऱ्याच दिवशी मुंबईला व तेथून दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. पक्षाध्यक्षांची सदिच्छा भेट हे दिल्ली दौऱ्याचे निमित्त असले, तरी त्यासोबतच निवडणूक आयोगासमोरील कायदेशीर लढाईची पूर्वतयारी, विधिज्ञांशी सल्लामसलत हेही कारण असावे, असे सांगितले जाते. या प्रकरणात तक्रारकर्ते माधव किन्हाळकर हे तयारीनिशी सज्ज आहेतच. पण आता भाजपही या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे संकेत माधव भंडारी यांनी दिले आहेत.
दरम्यान, ‘पेड न्यूज’ प्रकरण किंवा निवडणूक खर्चाची छाननी या प्रकरणात केवळ चव्हाण यांच्यावर अन्याय होऊ नये, या भूमिकेतून पत्रकार आनंद कुलकर्णी यांनी मागच्या आठवडय़ात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व विद्यमान आमदार, तसेच २००९च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या निवडणूक खर्चाचीही छाननी झाली पाहिजे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. त्यांनी निवडणूक आयोगाकडेही स्वतंत्र तक्रार केल्याने मूळ प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

Story img Loader