बिअर व विदेशी मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या औरंगाबादेत धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे, तर विदेशी मद्य बनविणाऱ्या डीजीआयओ कंपनीने तिची शाखा पंजाबमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे या कंपनीचे या महिन्याचे उत्पादन १८ टक्क्य़ांनी घटले आहे. मिलेनियम व काल्स बर्ग या दोन बिअर कंपन्यांचे उत्पादन या महिन्यात घटले. काही कंपन्यांचे उत्पादन वाढूनही राज्य उत्पादन शुल्क मात्र उणे चिन्हातच दर्शविले जात आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही तूट ८ कोटी २९ लाख ५२ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.
बिअर उत्पादनावर येत्या काही दिवसांत पाण्याचे संकट येऊ शकते. दारू कंपन्यांना पाणीपुरवठा करण्याऐवजी शेतीला पाणी दिले जावे, तसेच पाणी उपशासाठी वीजजोडण्या द्याव्यात, यासाठी पैठणच्या शेतकऱ्यांनी नुकतेच आंदोलन केले. एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची वीज शेतकऱ्यांनी तोडली होती. या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यातील मद्यनिर्मितीचे आकडे व राज्य उत्पादन शुल्काच्या करवसुलीचे आकडे उणे चिन्हात आहेत.
ओबीडी व डीआयजीओ या दोन विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची आकडेवारी आहे. डीआयजीओ या कंपनीच्या उत्पादनातही घट आहे. या दोन्ही कंपन्यांकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळणारे राज्य उत्पादन शुल्क कमी झाल्याने नक्की काय समस्या निर्माण झाली आहे, याचा शोध अधिकारी घेत आहेत. लीला सन्स या बिअर कंपनीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील निर्मितीशी तुलना केली असता या वर्षी वाढ झाली असली तरी विक्रीत मात्र मोठी घट झाली. हा फरक १० टक्क्य़ांचा असल्याने राज्य उत्पादन शुल्कात ८५ लाखांची घट झाल्याची आकडेवारी आहे.
मिलेनियम या बिअर उत्पादनातही घट झाली आहे. उत्पादनात १४ टक्के, तर विक्रीत ९ टक्क्य़ांची घट झाल्याने अपेक्षित महसुलाच्या २ कोटी २२ लाख कर कमी मिळाला.     

Story img Loader