राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (७ डिसेंबर) नागपूरच्या विधानभवनात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून आज विरोधी पक्षातील नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी नेहमीप्रामणे बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीतर्फे आज (६ डिसेंबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन काळात कोणते मुद्दे ठेवणार याविषयी माहिती दिली.
“विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपूत्र म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देईन. महिला, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं, या राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. यासाठी राज्यापुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता”, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यावेळी उपस्थित आहेत. खरंतर, पुरोगामी महाराष्ट्राची अशी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडून वेगवेगळ्या पक्षाचे सरकार सत्तेत आलेलं आहे. २०२२ वर्षांतील सर्वाधिक गुन्हे नोंदल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दंगलीचं प्रमाण वाढलं. नागपुरात अधिवेशन होतंय, या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. नागपूरची ओळख चोरांची नगरी म्हणून झाली आहे. याचा अर्थ या राज्याची सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होतंय असं दिसतंय. महाराष्ट्राची ही ओळख असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येईल? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गरिबी, बेरोजगारीमुळे राज्यात जगणं कठीण झालंय. त्यामुळे आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार शासन आपल्या दारी मोठा इव्हेंट होताना दिसतोय. बीडमध्ये दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबडरे मोडले असताना करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. इव्हेंट करून बॅनर, हार तुरे लावले, याची लाजतरी वाटली पाहिजे. शेतकऱ्यांप्रती कणव नाही, हे यातून दिसून आलेलं आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारचे प्रश्न मोठे आहेत, परंतु अधिवेशाचा कालावधी कमी आहे, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असंही ते म्हणाले.