गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण जागर यात्रा काढली आहे. या यात्रेत आज राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या होत्या. तर, राज ठाकरे यांनी रायगडच्या कोलाड येथून कोकणी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील जमिनी विकू नका असं सांगतानाच कोकणातील जमिनींचं गणितही विषद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोणत्या सरकारचा मुर्खपणा माहित नाही, पण हायवेवर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. किती पैसे खायचे यालाही मर्यादा असते. जगभर कुठेही गेलात तर तुम्हाला कॉन्क्रिटचे रस्ते मिळतात. पेव्हर ब्लॉक फुटपाथवर असतात. टेंडर काढायचे आणि तुम्हाला दिवसभर या खड्ड्यांतून घेऊन जायचं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“१९९५ साली बाळासाहेबांनी सांगितलं होतं की दोन तासांत पार करता येईल असा रस्ता बनवायचा आहे. महाराष्ट्र हा नेहमीच पुढारलेलाच होता, महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली. मुंबई पुणे हायवे झाल्यावर देशाला कळलं की अशा प्रकारचा रस्ता बांधता येऊ शकतो. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला. अख्ख्या देशाला कळलं की असा रस्ता होऊ शकतो, तेव्हा देशभर चांगले रस्ते झाली. ज्या महाराष्ट्राने आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रातील रस्ते असे आहेत”, अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

हेही वाचा >> “फडणवीसांना फडतूस, कलंक म्हणालो, पण आता…”, उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, “टरबुजाच्या झाडाला…”

भावनेला हात घालून मतदान करता

“हा रस्ता असा का, यामध्ये खड्डे असे का, रस्ता का होत नाहीय सोपं उत्तर आहे याचं. याचं कारण तुम्हाला राग येत नाही. मेल्या मनाचे पडलोय आम्ही. त्याच त्याच पक्षाच्या आमदार आणि खासदारांना निवडून देतोय. अपघातात आपल्या घरातील किती लोकं मेलीत हा विचार करत नाही. भावनेला हात घालतो आणि भावनेला हात घालून मतदान कोणाला करायचं हा विचार करतो. पण इतकी वर्षे आपण काय भोगतोय हा साधा विचारही करायचा नाही”, असंही ठाकरे म्हणाले.

मामुली किंमतीत जमिनी घेऊन कोट्यवधींना विकणार

“मी हात जोडून कोकणी बांधवांना विनंती करतो की जमिनी विकू नका. हा रस्ता असा (अपूर्ण) ठेवण्यामागचं सर्वांत मोठं कारण अत्यंत चिरीमिरीमध्ये जमिनी विकत मिळत आहेत. अत्यंत मामुली किंमतीत जमिनी विकत घेतली जात आहेत. जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा शंभरपट किंमतीत तुमच्याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जाणार आहेत. पैसे ते कमवणार, आणि तुम्ही तसेच राहणार”, असं राज ठाकरे म्हणाले.

जमिनींचं गणित समजून घ्या

“आपल्याकडे कुंपणच शेत खातंय. आपलेच लोक जाऊन मामुली किंमतीत जमिनी विकत घेऊन व्यापाऱ्यांना करोडो रुपयांना विकताहेत. दळवळण जेव्हा चांगलं होतं, रस्ते चांगले होतात तेव्हा आजूबाजूच्या जमिनींना काय भाव मिळतात हे गणित समजून घ्या. या जमिनी तुमच्या आहेत, त्या तशाच ठेवा. आज ना उद्या रस्ता होईल, रस्ता झाल्यावर त्याची किंमत तुम्हालाच मिळेल. या व्यापाऱ्यांच्या हाताखाली या जमिनी घालू नका. त्यांना काय रट्टे लावायचे ते आम्ही लावू”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी कोकणी बांधवांना साद घातली आहे.

पदयात्रा सोपा मार्ग

“सरकारला जाग आणण्यासाठी पदयात्रा आयोजित केली. पदयात्रा हा सोपा मार्ग असतो. सरकारचं धोरण आहे की पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा. आज पदयात्रेतून सरकारला काही गोष्टी शांततेत सांगायच्या आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले.

खड्डे भरता येतात, माणसं परत आणता येत नाहीत

“शस्त्रक्रिया झाली नसती तर मीही चाललो असतो. पण आमचा अमित, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वसंत मोरे, राजू पाटील ही सर्व मंडळी या रस्त्यांवर चालले. काय चाळण झालीय या रस्त्याची. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की कोकणी माता भगिनींना गेली अनेकवर्षे खड्डे सहन करावे लागताहेत. तेच तेच आमदार-खासदार निवडून देतात आणि तेच तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करतात. या रस्ते अपघतात किती लोक गेले असतील? रस्त्यावर पडलेले खड्डे भरता येता पण माणसाचं आयुष्य पुन्हा आणता येत नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With folded hands the konkani brothers request that raj thackeray presented the math of lands from konkan jagar yatra sgk