राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी व विदर्भ या चार विभागांतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक उद्या (शनिवारी) व रविवारी येथे होणार आहे. सूर्या लॉन्स येथे होणाऱ्या बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसरकार्यवाह दत्तात्रय होस्बळे मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, राज्य शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदी मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ, अ. भा. विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, संस्कृत भारती, आरोग्य भारती, क्रीडा भारती, सहकार भारती या संघटनांमधील पदाधिकाऱ्यांसह भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सर्व संघटनांच्या कामासंबंधीची माहिती, आगामी योजना व संघटनात्मक कार्याची वाढ या अनुषंगाने बैठकीत चर्चा होईल. बैठकीनिमित्ताने शहरात येणाऱ्या विविध मंत्र्यांनी विकासकामांच्याही बैठका लावल्या आहेत. शिक्षणमंत्री तावडे हे डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारी १ वाजता रुग्णालयाच्या दामुअण्णा दाते सभागृहात आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे.
रविवारच्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हेही उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या बैठकीनिमित्त आलेल्या मंत्र्यांनी विविध विभागांच्या बैठका घेण्याचे ठरविले आहे. सहकारमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सहकार विभागातील कर्मचाऱ्यांचा मेळावा होईल, तर विद्यापीठ वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास शिक्षणमंत्री तावडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे दोन दिवस अधिकाऱ्यांसाठी ‘बैठक दिन’ ठरतील. संघाच्या विविध क्षेत्रांतील प्रमुख कार्यकर्ते येणार असल्याने भविष्यातील त्यांच्या कामाची दिशा ठरेल, असे सांगितले जात आहे.

Story img Loader