नक्षलवाद्यांची पोलिसांना एकेकटे गाठून हत्या करण्याची व्यूहरचना
गेल्या तीन महिन्यांत नक्षलवाद्यांनी दीपक मुकूंद सडमेक, नानाजी नागोसे व बंडू वाचामी या तीन पोलिस शिपायांच्या हत्या स्पेशल अॅक्शन दलम, ग्रामरक्षक दल व एरिया रक्षक दलाचा वापर करून केलेल्या आहेत. मोठे हल्ले करून एकाच वेळी आठ-दहा पोलिसांना ठार करण्याऐवजी नक्षलवाद्यांनी त्यांना एकटे गाठून किंवा त्यांचे अपहरण करून हत्या करण्याची नवी व्यूहरचना आखली आहे.
पोलिसांनी नवसंजीवनी योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्याने पावणेदोन वर्षांत १०१ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात नक्षल दलम कमांडरपासून उपकमांडर, स्पेशल अॅक्शन दलम सदस्य, ग्रामरक्षक व एरिया रक्षक दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळ दंडकारण्यातील नक्षल चळवळीला हादरा बसला बसला आहे. मोठे भूसुरूंग स्फोट किंवा चकमकी करून पोलिसांचे बळी घेण्यात ते असमर्थ ठरत आहेत. त्यांमुळेच त्यांनी आता पोलिसांना एकटे गाठून त्यांची हत्या करण्याचे सत्र आरंभले आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत नक्षलवाद्यांनी तीन पोलिस शिपायांची निर्घृण हत्या केली. बंडू वाचामी या पोलिसाचे १० मे रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. हा दौरा संपत नाही तोच नक्षलवाद्यांनी बंडूच्या डोक्यात गोळ्या घालून एकप्रकारे पोलिस महासंचालकांना संदेश दिला आहे.
गेल्या ११ मार्चला हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेकचा अशीच हत्या करण्यात आली होती. हेडरी येथे आठवडी बाजारात दीपक तैनात असताना साध्या वेषातील पाच-सहा नक्षलवाद्यांनी दीपकवर गोळ्या झाडून त्याची बंदूक घेऊन पोबारा केला होता. छल्लेवाडातही माजी आमदार दीपक आत्राम यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सभा सुरू असताना त्यांचा अंगरक्षक नानाजी नागोसे जिल्हा परिषद शाळेच्या आडोशाला लघुशंकेसाठी जात असतानाच सहा-सात नक्षलवाद्यांनी त्याला गोळय़ा घातल्या. विशेष म्हणजे, असे काही होणार असल्याची माहिती गावकऱ्यांना होती. किंबहुना ही हत्या कटाचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. नक्षलवाद्यांनी आता स्पेशल अॅक्शन दलमच्या माध्यमातून हे हत्यासत्र आरंभिले आहे. या घटनांमुळे पोलिसांनीही एकटे कुठे जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
साध्या वेषातील नक्षलवादी सध्या गावागावात फिरत असल्याने पोलिसांनी सावध राहावे तसेच स्पेशल अॅक्शन टीमवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नक्षली समोरासमोरून युध्द न करता असे हल्ले करून भ्याडपणा सिध्द करत आहेत. या कृत्यात एसआरडी, जीआरडी सदस्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. या हत्यांमुळे नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, पोलीस स्पेशल अॅक्शन टीमसह ग्रामलक्षक दल व एरिया रक्षक दलाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.