कोणतीही करवाढ नसलेले ७४२ कोटी ४२ लाख रुपयांचे महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. महापालिकेत आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडी आणि कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वातील शहर विकास आघाडीची सत्ता असून भाजप, राष्ट्रवादी व महानगर विकास आघाडी विरोधात आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असल्याने तिन्ही विरोधी सदस्यांनी अंदाजपत्रक फसवे असल्याची टीका केली आहे. स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात खुल्या भूखंड कराचे उत्पन्न २५ कोटी दाखविण्यात आले होते. त्यात स्थायीने आठ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ करून हे उत्पन्न ३३ कोटी ७५ लाख रुपये दर्शविले. त्यावर भाजपच्या सुरेश भोळे यांनी आक्षेप घेतला. गेल्या वेळीही या कराचे उत्पन्न २५ कोटी दर्शविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र तीन वर्षांत खुल्या भूखंड कराचे उत्पन्न फक्त एक कोटी ६८ लाख रुपये असल्याचे सांगत आकडेवारी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कराच्या उत्पन्नात प्रशासनाने ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न दर्शविले होते. त्यातही स्थायी समितीने सहा कोटीची वाढ करून हे उत्पन्न ९१ कोटी दर्शविल्याने विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला. महापालिकेत २००९-१० मध्ये एलबीटी कराचे उत्पन्न सुरू झाले. पहिल्या वर्षी ६१ कोटीचे उत्पन्न मिळाले. दरवर्षी त्यात साधारण १० टक्के वाढ होणे अपेक्षित असताना गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात घट झाली आहे. एलबीटी विभाग अधीक्षक, अधिकारी वर्ग या वसुलीत दिरंगाई करीत असताना २०१३-१४ या आर्थिक वर्षांत कराचे उत्पन्न ९१ कोटी अपेक्षित कसे धरले असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. एलबीटी विभाग अधीक्षक राजेंद्र पाटील यास उत्पन्नात झालेल्या घटसाठी जबाबदार धरण्यात येऊन गेल्याच महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.