घट्टेवाडी शिवारात विनापरवाना सुरू असलेल्या जनावरांच्या हाडापासून व टाकाऊ मांसापासून काढण्यात येणाऱ्या चरबी उद्योगावर  ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून घट्टेवाडी शिवारात विनापरवाना जनावरांच्या हाडांपासून चरबी काढण्याचा उद्योग बिनबोभाट सुरू होता. या चरबी काढण्याच्या उद्योगामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते. हा उद्योग अतिशय दरुगधी पसरविणारा आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात चरबी काढली जाते. चरबी तयार करण्यासाठी या ठिकाणी बाहेरून कत्तलखान्यात नुकत्याच कापलेल्या जनावरांचे अवयव येथे आणले जात. या कारखान्यामुळे परिसरातील पाच ते सहा गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या कारखान्यात काम करण्यासाठी मजूर बिहारमधून आणले जात.
विनापरवाना कारखान्यावर रविवारी सकाळी ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाटय़ासह उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते व सहायक पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी छापा टाकला. चरबीची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेला आयशर टेम्पो (एमएच१३, एएल३००२) यांसह ७६ हजार रुपये किमतीची २०० लिटर्सचे ३८ बॅरेल चरबी, २४ हजार रुपये किमतीची २०० लिटर क्षमतेचे ८० लोखंडी व प्लास्टिकचे रिकामे बॅरेल, ६५ हजार रुपये किमतीच्या पाच लोखंडी कढया, असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याचा मालक रशीद माजीद कुरेशी, इस्माईल आदम कुरेशी (दोघे रा. सोलापूर), खय्युम मो. शमीम शेख, माहियोद्दीन बशारत हुसेन शेख व शाहजहाँ जेहरूनहक शेख (तिघे रा. बिहार) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या इटकळ येथे जनावरांच्या हाडांपासून पावडर तयार करण्याचा तसेच नळदुर्ग परिसरातही अशाच प्रकारचा चरबी काढण्याचा उद्योग सुरू आहे.

Story img Loader