शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी (२५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर पीडित महिलेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. शेवाळेंनी दाऊद कनेक्शन, पाकिस्तानी मैत्रीण, कराचीला भेट असे अनेक आरोप केले. हे आरोप पीडित महिलेने फेटाळत शेवाळेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याशी सोशल मीडियावर लाईव्ह कॉन्फरन्समध्ये बोलत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिला म्हणाली, “मी दाऊद इब्राहिमला फक्त चित्रपटांमधूनच बघितलं आहे. मी सुल्तान मिर्झा चित्रपट पाहिला आहे. छोटा शकीलचं नाव मी बातम्यांमध्ये ऐकलं आहे. माझी अशी पीढि आहे ज्यांना या लोकांविषयी चित्रपट आणि बातम्यांमधून माहिती आहे. इतर काहीही माहिती नाही.”

“पाकिस्तानच्या मैत्रिणीसोबत राहुल शेवाळेही बोलले होते”

“राहुल शेवाळेंनी ज्या फराह नावाच्या महिलेचा उल्लेख केला ती माझी मैत्रीण आहे. तिच्याबरोबर राहुल शेवाळेही बोलत होते. राहुल शेवाळे आणि फराहच्या संभाषणाची मी ऑडिओ क्लिपही सादर करू शकते,” असं मत या महिलेने व्यक्त केलं.

“मी तुम्हाला माझा पासपोर्ट-व्हिसा दाखवते”

ही महिला पुढे म्हणाली, “मी तुम्हाला माझा पासपोर्ट-व्हिसा दाखवते. मी १२ वर्षांपासून दुबईत राहते. माझा छोटासा व्यवसाय आहे. तुम्ही दुबईत राहता तर तिथं सर्व देशांचे नागरिक राहतात. तिथं भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा सर्व देशांमधील नागरिक राहतात. महाविद्यालयातही भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा वेगवेगळ्या देशांची मुलं एकमेकांचे मित्र होतात. हे दुबईत फार सामान्य आहे.”

“पाकिस्तानी मैत्रीण आहे म्हणून मी लगेच दाऊद गँगची कशी?”

“मी तर दुबईतच शिकले आणि तिथंच व्यवसायही करते. त्यामुळे माझेही दुबईत मित्र झाले आहेत. आम्ही भारत-पाकिस्तानचे मित्र सोबत बसून क्रिकेटचे सामनेही पाहतो. म्हणून मी लगेच दाऊद गँगची झाले का? क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर जे भारत-पाकिस्तानचे नागरिक एकत्र बसतात ते दाऊद गँगचे होतात का?” असा सवाल या महिलेने विचारला.

खासदार राहुल शेवाळेंनी नेमके काय आरोप केले?

राहुल शेवाळे म्हणाले होते, “दुबईत रईस नावाचा व्यक्ती दाऊदचं काम करतो. त्याच्यासोबत माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे संबंध आहेत. ही महिला दाऊद गँगबरोबर आहे, असं मी खात्रीशीरपणे सांगतो.”

हेही वाचा : “खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

“ही महिला दाऊद गँगची आहे”

“या लोकांची पाकिस्तानमध्ये एक गँग आहे. त्या गँगमध्ये फराह म्हणून एक महिला आहे. तीही या महिलेबरोबर आहे. ही महिला फराहबरोबर दोनदा कराचीलाही जाऊन आली आहे. त्यामुळे पाकिस्तान कनेक्शन, दाऊद गँगचं कनेक्शन यामुळे हे वेगळं प्रकरण आहे. ही महिला दाऊद गँगची आहे,” असा आरोप शेवाळेंनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman answer shinde faction mp rahul shewale about rape allegation dawood pakistan connection pbs