रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज सरोदेवाडी अज्ञात चोरटय़ाने महिलेवर हल्ला करून सुमारे साडेबारा तोळय़ाचे सोन्याचे दागिने लुबाडण्याची घटना घडली आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जखमी महिलेला उपचारासाठी प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले की, विजया विलास केतकर (वय ६५ वर्षे) या घरामध्ये एकटय़ाच राहतात. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले असून मुले रत्नागिरीला असतात. त्यांच्या घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरटय़ाने मागील दाराने घरात प्रवेश केला. त्यावेळी केतकर स्वयंपाक खोलीत होत्या. चोरटय़ाने त्यांच्या डोक्यात सळईचे दोन घाव घालून जखमी केले. या अचानक हल्ल्यामुळे केतकर गडबडल्या.तसेच  डोक्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे रक्ताच्या धारा लागल्या. तशाही अवस्थेत केतकर यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. पण चोरटय़ाने त्यांच्या अंगावरील, तसेच कपाटातील काही दागिने गोळा करुन पोबारा केला. त्याने सुमारे साडेबारा तोळे दागिने चोरले. केतकरांच्या एका हातातील सोन्याच्या बांगडय़ा त्याला काढता आल्या नाहीत. या धांदलीत सोन्याच्या रिंगा व अन्य दागिने वाटेतच पडले.

केतकरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांना प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

हा प्रकार समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी रात्रभर चोरटय़ाचा सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु यश आले नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक युनिटचे अक्षय कांबळे आणि ठसे तज्ज्ञ अमोल कदम यांनी घटनास्थळी आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. चोरटय़ाचा भाग काढण्यासाठी श्वानपथकही आणण्यात आले. पण ते घराजवळून महामार्गापर्यंत जाऊन घुटमळले. यावरून चोरटा तेथून गाडीचे पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार मोहन कांबळे, संतोष कांबळे, राकेश तटकरी व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. याशिवाय रत्नागिरी ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची दोन स्वतंत्र पथके स्थापन करून चोरटय़ाचा तपास सुरू केला आहे. या परिसरातील पहिलीच घटना असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman attacked by a rod and robbed her gold jewellery zws