कराड : आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील दांगट वस्तीत प्रेमसंबधातून एका ३० वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय ३५) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबधित महिला विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट वस्ती येथे आई-वडिलांकडे राहण्यास आहे. तिला तीन मुले आहेत. रविंद्र याच्याशी तिचा पूर्वीचा परिचय असून तिचे त्याच्याशी प्रेमसंबधही होते. गुरुवारी दुपारी रविंद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर रविंद्रने तिच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेल्याने तिचा जबडा पूर्ण फाटून ती गंभीर जखमी झाली आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर रविंद्रने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देवून पाहणी करून घटनास्थळचा पंचनामा केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader