लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून संगमेश्वर मधील एका निवृत्त महिलेला ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ महादेव धावडे ( वय ४८) रा. लेन क्र. ७, शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, पुणे याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणिता प्रमोद आगरे उर्फ कल्पना महादेव धावडे (वय ४८) यांनी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार १८ ऑक्टोबर २०२२ ते २० जून २०२४ या कालावधीत घडला असून प्रणिता आगरे या सेवानिवृत्त आहेत. त्या मुंबई दादर येथे राहतात.
त्यांच्या मुलीला पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे विश्वनाथ महादेव धावडे याने सांगितले होते. या प्रवेशासाठी विश्वनाथ धावडे याने प्रणिता आगरे आणि त्यांचे पती प्रमोद आगरे यांच्याकडून २०२२ पासून वेळोवेळी पैसे घेतले. त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३५ लाख रुपये धावडे याला दिले. मात्र, त्यानंतर विश्वनाथ धावडे याने मुलीचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करून न दिल्याने आगरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या फसवणूक प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.