अलिबाग : हॉटेल खोलीच्या भाड्यावरून झालेल्या वादातून पर्यटकांनी एका महिलेची गाडीखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे घडली आहे. ज्योती धामणस्कर असे मृत महिलेचे नाव असून त्यांचा ‘होम स्टे’चा व्यवसाय होता. श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती

पिंपरी-चिंचवड येथील आठ पर्यटक रविवारी रात्री दीडच्या सुमारास हरिहरेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांनी धामणस्कर यांच्या ‘ममता होम स्टे’मध्ये खोलीची विचारणा केली. भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादानंतर मद्याधुंद अवस्थेतील पर्यटकांनी धामणस्कर यांना मारहाण केली व पळून गेले. मात्र त्यांच्यापैकी एक जण मागे राहिला व त्याला इतर गावकऱ्यांच्या मदतीने धामणस्कर यांनी पकडून ठेवले. आपल्या साथीदाराला नेण्यासाठी आरोपी पुन्हा घटनास्थळी आले.

हेही वाचा >>> माजी आमदार परशुराम उपरकर ठाकरे शिवसेनेत स्वगृही परतले

गावकरी साथीदाराला सोडत नसल्याच्या रागातून त्यांनी धामणस्कर यांना गाडीखाली चिरडले व पसार झाले. जखमी झालेला धामणस्कर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी इरप्पा यमनप्पा धोत्रे याला घटनास्थळावरून अटक केली. तर आकाश गावडे, विकी प्रेमसिंग गिल यांनाही अटक झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman crushed to death under a car by tourists due to a dispute over rent zws