गेल्या चार दिवसापासून मिरज शहरातील गॅस्ट्रोची साथ अद्याप नियंत्रणात आली नसून रविवारी एका वृध्द महिलेचा ब्राम्हणपुरीत मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता चार झाली आहे. साथीचे आजार प्रसारित होण्यास महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोप खा. संजयकाका पाटील यांनी केला.
शहरात सर्वात सुरक्षित भाग म्हणून मिरजेतील ब्राम्हणपुरी, विजापूरवेस हा भाग ओळखला जातो. मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून या भागात गॅस्ट्रोने थमान घातले आहे. घरटी रूग्ण पाहायला मिळत असून दवाखाने तुडुंब भरले आहेत. घरात, गॅरेजमध्ये रूग्णांना जीवरक्षक सलाईन लावण्यात आले असून अद्याप साथ आटोक्यात आलेली नाही.
ब्राम्हणपुरीतील जिलेबी चौकात राहणारी वृध्द महिला सुहासिनी भालचंद्र जोग वय ७० ही गॅस्ट्रोने दोन दिवसापासून त्रस्त होती. काल तिला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. मात्र आज सकाळी तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गॅस्ट्रोने शहरात गेल्या चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला असून आज घ्यावयाच्या खबरदारीची हस्तपत्रिका वितरित करण्यात आली.
दरम्यान, खा. पाटील व आ. सुरेश खाडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात जाउन रूग्णांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. पाटील ही साथ पसरण्यास महापालिकेच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला. गेल्या ५० वर्षांत शहरातील पाणीपुरवठा करणा-या नलिका बदलण्यात आल्या नाहीत. ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यात आली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात मंत्रीमंडळ विस्तारानंतर नगरविकास विभाग कोणाकडे जातो हे निश्चित झाल्यानंतर महापालिका पदाधिका-यांसमवेत भेट घेउन सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader