सोलापूर : मोहोळ शहरात एका डॉक्टर महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उशिरा घडली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. डॉ. रश्मी संतोष बिराजदार (वय ३६) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मोहोळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बिराजदार कुटुंबीयांच्या दोन मजली इमारतीत तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बीएएमएस वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. रश्मी बिराजदार यांचा मोहोळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नावाचा दवाखाना आहे. दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात.
हेही वाचा >>> Maharashtra News Live : हिंगोलीत पावसाचा हाहाकार; अनेक भागात पिकांचं नुकसान, अनेकांच्या घरात पाणी शिरलं
डॉ. रश्मी यांचे पती संतोष शंकर बिराजदार हे स्टेशनरी व्यापारी आहेत. त्यांचे दुसरीकडे दुकान आहे. नेहमीप्रमाणे संतोष बिराजदार हे व्यवसाय सांभाळत आपल्या स्टेशनरी दुकानात बसले होते. तेव्हा दुपारी उशिरा दवाखान्यातील कर्मचारी सलीम ऊर्फ सद्दाम मकानदार याने भ्रमणध्वनीवर संतोष यांना संपर्क साधून डॉ. रश्मी यांनी घरात गळफास घेतल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून पाहिले असता पत्नी डॉ. रश्मी यांनी छतावरील विद्युत पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. बंद लाकडी दरवाजा तोडून डॉ. रश्मी यांचा गळफास सोडवून त्यांना मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. संतोष बिराजदार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.