लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : धनगाव (ता. पलूस) येथे दिवसाढवळ्या महिलेला मारहाण करून दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. चोरट्याच्या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, तिला बेशुद्धावस्थेत भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच गावातील तरुणांनी पलायनाच्या प्रयत्नातील तीन दरोडेखोरांना साहित्यासह नदीपात्रात पोहून ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
धनगावमध्ये उषा निखिल कोळी (वय ३४) या कपडे धूत असताना अचानक आलेल्या अज्ञाताने डोकीत मारहाण केली. या हल्ल्यात महिला जबर जखमी झाली असून, आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ जमले. त्याच वेळी महिलेची शुद्ध हरपली. तिला उपचारासाठी तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिच्याजवळ असलेले दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. तसेच मराठी शाळेजवळ असलेल्या वस्तीवरून एका मुलीच्या डोकीत मारून कानातील दागिने लंपास केले आहेत. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
आणखी वाचा-अजगर पकडल्याने वारणावती निर्धास्त, तर कर्नाळ परिसर बिबट्याचा वावराने भयभीत
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जवळच असलेल्या आमणापूर शेरी भागात संशयास्पद टोळी वावरत असल्याची माहिती मिळताच तरुणांनी पाठलाग सुरू केला. या वेळी चोरट्यांनी पळून जाण्याच्या हेतूने कृष्णा नदीत उडी मारली. धनगावच्या तरुणांनी नदीत उतरून तिघांना ताब्यात घेऊन बेदम चोप दिला. मात्र, टोळीतील अन्य चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
ताब्यात घेतलेल्या तिघांना पलूस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लखन ऊर्फ आकाश नारायण भोसले (वय २३), नागदा विलास भोसले (वय ४०, दोघे रा. नवाबपूरवाडी ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) आणि रोहित जनार्दन पवार (वय २३ रा. शेणोली, ता. कराड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे कटावणी, दुपाती चाकू, मिरची पूड, लोखंडी पाना, कात्री, एक लगोरी, कानटोप्या, मास्क, विजेरी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.