गडचिरोली जिल्हय़ात घोट-रंगडीच्या जंगलात नक्षलविरोधी मोहीम राबविणाऱ्या सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत रिंकी लेकामी ही महिला नक्षलवादी ठार झाली तर पोलीस दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले. या वेळी घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले.
नक्षलविरोधात चालवलेल्या कडक मोहिमेचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलिसांनी चामोर्शी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोट उपपोलीस विभागांतर्गत घोट-रंगडी मार्गावरील जंगलात आज सकाळी नऊ वाजल्यापासून सी-६० पथकाने नक्षलविरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. जंगलात काही किलोमीटरवर नक्षलवाद्यांनी अचानक सी-६० पथकाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या गोळीबारातून स्वत:ला सावरत पथकातील कमांडोने नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने महिला नक्षलवादी रिंकी लेकामी ही ठार झाली. नक्षलवाद्यांच्या बंदुकीचे छरे लागल्याने पोलीस दलातील महेंद्र कुडेती व प्रफुल्ल चिंतले व अन्य एक असे तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षलवादी महिला दलम सदस्याचा मृतदेह सोडून घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. रिंकी लेकामी ही गट्टा गिलनगुडा येथील रहिवासी आहे. मागील बारा वर्षांपासून ती नक्षल चळवळीत सक्रिय होती. घटनास्थळावरून पोलिसांनी बारा बोअरची बंदूक तसेच मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्तकेले.
या चकमकीत जखमी झालेल्या महेंद्र कुडेती व प्रफुल्ल चिंतले यांना तातडीने हेलिकॉप्टरने नागपूर येथे आणण्यात आले. तिथे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या प्रकृती स्थिर आहे. अन्य पोलीस जवानाला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नक्षलवादी याच भागात जंगलात दडून बसले असावेत ही शक्यता लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.   

Story img Loader