सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकात नेहमीप्रमाणे सकाळी दूर पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची लगबग सुरू असताना पलिकडे थांबलेली मालगाडी हळूहळू सुरू होऊन कलबुर्गी-वाडीच्या दिशेने हळूहळू वेग घेण्याच्या तयारीत असताना तेथे अचानकपणे मोठा आरडाओरडा सुरू झाला. कारण त्याच वेळी गाडीच्या रुळावर एक मनोरुग्ण महिला नैसर्गिक विधीसाठी बसली होती. ती महिला गाडीखाली चेंगरली जाणार, पण केवळ दैव बलवत्तर म्हणून ती महिला बालंबाल बचावली. देवदूत म्हणून धावून आलेल्या एका सफाई कामगाराने त्या महिलेस आहे त्या स्थितीतच दोन्ही रुळांमध्ये डोके खाली ठेवून झोपून सांगितले. तोपर्यंत मालगाडीचे पाच डबे रूळावरून पुढे गेले. पण ती महिला रूळावर झोपून राहिल्यामुळे सुखरूप बचावली.

सोलापूर रेल्वे स्थानकात पाच क्रमांकाच्या फलाटावरून मालगाडी वेळेनुसार कलबुर्गी-वाडीच्या दिशेने निघाली. गाडी सुरू झाली तेव्हा तेथील काही लोकांचे लक्ष त्या मालगाडी मार्गक्रमण करणाऱ्या रूळावर बसलेल्या महिलेकडे गेले आणि ती महिला मालगाडीखाली चेंगरली जाणार, या भीतीने आरडाओरडा झाला. त्याचवेळी तेथे सफाई कामगार मंगेश शिंदे यांचेही लक्ष गेले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत मालगाडीच्या रूळावर बसलेल्या त्या महिलेला रूळावर आहे त्या स्थितीतच डोके खाली वाकवून झोपून राहण्यास जोरात ओरडून सांगितले. त्या महिलेनेही सुदैवाने सांगितल्याप्रमाणे कृती केली आणि दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला.

या घटनेनंतर भेदरलेली ती महिला क्षणार्धात तेथून निघून गेली. ती महिला मनोरूग्ण असली तरी कदाचित रेल्वे पोलिसांकडून कारवाई होण्याची भीती तिला वाटली असावी. त्याची चर्चा रेल्वे स्थानकावर बराच वेळ सुरू होती.

Story img Loader