सोलापूर : घरावर काही व्यक्तींनी वाईट हेतूने करणी व भानामती केली आहे. त्यामुळे घरात एकामागून एक दु:खाचे संकट कोसळत असल्याची थाप मारून एका महिलेच्या घरात आलेल्या दोघा जणांनी पूजेच्या नावाखाली सोन्या-चांदीचे दागिने समोर ठेवायला सांगितले आणि बेमालूमपणे ते सर्व दागिने लंपास केले. ही घटना सोलापुरात सदर बाजार भागात आकांक्षा सोसायटीत घडली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर दोन्ही संशयितांना अटक केली.

नगिना मोहम्मद आरीफ (वय ३७, रा. राम पार्क, लोनी, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आबीद रसीद (वय ५५, रा. संजय कॉलनी, मोहननगर, गाझियाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून लुबाडलेले संपूर्ण दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत रेखा तानाजी काळे (वय ४५, रा. ए-३, आकांक्षा सोसायटी, यलगुलवार प्रशालेजवळ) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरात सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी एक महिला आणि पुरुष असे दोघेजण आले.

या दोघांनी रेखा काळे यांना, तुमच्या घरावर काही व्यक्तींनी वाईट हेतूने करणी-भानामती केली आहे. त्यामुळे घरात नेहमीच दु:ख, संकट येते. दुःखाचे निवारण करण्यासाठी आणि करणी-भानामती काढण्यासाठी घरात पूजाविधी करावा लागेल, असे सांगितले. त्यावर भावनेच्या भरात विश्वास ठेवून रेखा काळे यांनी घरात पूजा करण्यास संमती दिली. त्याप्रमाणे पूजा करताना पणत्या पेटविण्यात आल्या.

पणत्यांमध्ये घरात असलेले सर्व सोने-चांदीचे दागिने आणून ठेवायला सांगितले. त्यानंतर रेखा काळे यांनी घरातील एक लाख ८६ हजार रुपये किमतीचे दागिने आणून ठेवले. नंतर त्या दोघांनी रेखा यांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी पणत्या लावण्यात गुंतविले आणि बेमालूमपणे सर्व दागिने लंपास केले. या गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन्ही संशयितांचा शोध घेऊन चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्याची यशस्वीपणे उकल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नितीन शिंदे व सहायक फौजदार औदुंबर आटोळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader