सोलापूर : भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करून सोलापुरात पोलिसांत फिर्याद नोंदविलेल्या एका तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विषप्राशन केले. तिने विष प्राशन करण्यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह श्रीकांत देशमुख व त्यांचे दोन्ही भाऊ हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. दरम्यान, विषप्राशन केलेल्या पीडित तरूणीला तात्काळ सांगोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी गेल्या वर्षी मुंबईत ओशिवारा पोलीस ठाण्यात आपणांस एका तरूणीने मोहजालात अडकावून खंडणी मागितल्याची फिर्याद दाखल केली होती. परंतु नंतर संबंधित तरूणीने आपल्यावर श्रीकांत देशमुख यांनी लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. देशमुख यांच्यासोबत एका बंद खोलीत एकांतवासात असतानाच्या प्रसंगाची चित्रफित पीडित तरूणीने समाज माध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. त्यामुळे काही दिवसांतचा देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावरून प्रदेश पक्षश्रेष्ठींनी मुक्त केले होते. तथापि, पीडित तरूणीने श्रीकांत देशमुख यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दाद मागूनही आपणांस न्याय दिला नाही. उलट त्रास दिल्याचा आरोप समाज माध्यमांद्वारे केला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख ‘शिल्लक सेना’ करत देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “उद्धवजींना…!”

या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी पीडित तरूणीने श्रीकांत देशमुख यांचे सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विषप्राशन केले. तत्पूर्वी तिने चित्रफित प्रसारीत करून आपणांवर झालेल्या अन्यायामुळे आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले होते. आपल्या आत्महत्येला भाजप नेते चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, श्रीकांत देशमुख व त्यांचे भाऊ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. नंतर पीडित तरूणीने विषप्राशन केल्याचे दिसून येताच काही गावक-यांनी तिला ताब्यात घेऊन सांगोला शासकीय रूग्णालयात दाखल केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman took poison while holding bjp leaders responsible in bjp former solapur district president shrikant deshmukh issue asj